Translate

Thursday, April 7, 2022

मोठा माणूस | निळू फुले

 

महाबळेश्वरला जाताना वळण घेण्याआधी पुणे सातारा मार्गावर एक हॉटेल लागायचं, त्यावर निळू फुले यांचे चित्र  होतं आणि लिहलेले असायचं "मोठा माणूस" फक्त खलनायकी भूमिका पाहिलेल्या लोकांना नीलकंठ कृष्णाजी फुले हउर्फ निळूभाऊंचे हे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि प्रत्यक्ष जीवनात मितभाषी आणि संकोची वृत्तीचे होते हे सांगूनही खरं वाटणार नाही. श्रीराम लागू यांना आम्ही भेटायला ( मुलाखत ) गेलो असताना डॉक्टरांना मी प्रश्न विचारला होता की निळूभाऊंबरोबर तुमचे संबंध कसे होते ? तर त्यावर लागू म्हणाले की फार मोठा मनाचा माणूस आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हा प्रसंग मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे निळूभाऊ माझ्यासाठी वेगळं समीकरण बनले, मी अनेक पुस्तकं, सेवादल व विवेक मासिक व दिवाळी अंक वाचत हा माणूस समजत गेलो. महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. 

               सुरुवातीपासूनच चे राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत कार्यरत होते. अशा ठिकाणी त्यांच्यातला नट कधीच अस्तित्वात नसायचा. विनम्रता आणि भिडस्तपणा एवढा की, आजूबाजूच्या माणसांना संकोच वाटावा.  ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करत ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णांची’ भूमिका निळू फुलेंना चित्रपट जगतात एक वेगळीच ओळख देउन गेली. मराठी चित्रपट सृष्टीत ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटातून निळूभाउंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत. नाटक आणि सिनेमामधून त्यांनी साकारलेल्या नायकी-खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली खरी, पण निळू फुलेंनी साकारलेल्या जवळपास सर्वच खलनायकी पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. नाट्यक्षेत्रातही त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय.

       कराड येथे एकदा नाट्यसंमेलन  भरले होते तेव्हा मनोहर जोशी हे संमेलनाध्यक्ष होते  आणि लोकसभेचे देखील अध्यक्ष होते ते विजय तेंडुलकर यांची महती सांगत गुणगान करीत होते तेव्हा निळूभाऊ त्यांचे भाषण वाचून आले आणि दुसऱ्या दिवशी कडाडले की .... . . . ‘काल लोकसभेचे सभापती माननीय मनोहर जोशी म्हणाले की, तेंडुलकर हे मोठे नाटककार होते. पण याच जोशींना मी पंचवीस वर्षापूर्वी निदर्शनं करताना आणि नाटय़गृहातल्या खुच्र्याची, लाइटची मोडतोड करताना पाहिलंय. कलावंतांना स्टेजवर शॉक बसायचे म्हणून कलावंत घाबरायचे. आणि आज हे सांगताहेत तेंडुलकर थोर नाटककार होते म्हणून. तेंडुलकर मोठे होते, हे समजायला यांना पंचवीस वर्षे लागली. म्हणून म्हणतो, अहो जरा वाचत जा. विचार करीत जा. समजत नसेल ते समजून घेत जा...’  असा होता हा माणूस....... सज्जन परंतु रोखठोकपणे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार करणारे. बंदिस्त नसलेल्या लोकनाटय़ात हजरजबाबीपणाचे दर्शन घडविणारे निळूभाऊ.. एरवी नम्र असलेले मात्र, रंगमंचावर दरारा असलेले..

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मुलगी गार्गीला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र, तरीही वेळ मिळाल्यावर गार्गीशी नाटक, चित्रपट, अभिनय या विविध विषयांवर चर्चा करण्यास फुले प्राधान्य देत. त्यांनी गार्गीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. वडिलांच्या बऱ्या-वाईट भूमिकेबद्दल ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची. वडीलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. तुला पाहते रे मध्ये गार्गी फुले यांना तुम्ही पाहिलं असेलच. 

मोठा माणूस

 ...  राम नगरकर यांनी ‘रामनगरी’मध्ये त्या संदर्भातली आठवण लिहिलीय. १९७२च्या दुष्काळातली ही घटना आहे. त्या काळात राम नगरकरही निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही घेत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवादलानं गोळा केलेलं धान्य निळूभाऊंच्या घरी ठेवलं होतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस निळूभाऊ आणि राम नगरकर बाहेर जायला निघतात,तेवढय़ात निळूभाऊंची आई त्यांना हाक मारून बोलावते. म्हणते, थोडे पैसे दे. निळूभाऊ म्हणतात, माझ्याकडं पैसे नाहीत. आई म्हणते, घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? त्यावर ते म्हणतात, काहीही कर. त्या माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण येते. ती सहज म्हणते,यातलं पायलीभर धान्य घेऊ का, दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया. त्यावर निळूभाऊ तिला सांगतात, ‘ते लोकांचं आहे. उपाशी मेलो तरी चालेल, पण त्यातल्या दाण्यालाही हात लावायचा नाही.’ 

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...