Translate

Wednesday, April 21, 2021

10 short stories | Stay positive


लघु कथा  - - 1 | तीन औषधाच्या गोळ्या

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.


लघु कथा ..2 | जेवण


शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

लघु कथा  - -3 | काठी


आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.


लघु कथा  - - 4 | आंब्याचे झाड

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.


लघु कथा  - -5. | 
ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात
ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.


लघु कथा  - -6 | वाटणी

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.


लघु कथा  - -7 | प्रॉपर्टी 

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

   

लघु कथा  - -8 | पाकीट 

 तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये , तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच 5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त  बरा झाला की छानसी साडी घ्या. त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.


लघु कथा  - -9 | भेळ

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.


 लघु कथा  - -10 | मोग-याची फुले

 तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाई च्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

  सकारात्मक रहा..!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com


 

5 comments:

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...