Translate

Monday, April 19, 2021

Worship Dev Puja | The best meditation

देवपूजा - एक सर्वोत्तम मेडिटेशन

पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.

मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.

माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.

सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.

फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.

एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात.

तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.

चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.

ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.
तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.

खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी.


हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी....
अशी ही रोजची पूजा.

ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?


यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?

पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...



No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...